Thursday, May 31, 2018

रायगड किल्ला-एक अविस्मरणीय ट्रेकिंग

रायगड किल्ला-एक अविस्मरणीय ट्रेकिंग




रायगड ट्रेकिंग साठी मी खूपच उत्सुक होते.ट्रेकिंग बद्दल खूप  ऐकले होते पण तरीसुद्धा आपण जो स्वतः अनुभव घेतो त्याचा एक वेगळाच आनंद असतो.माझी पहिलीच ट्रेकिंग असल्याने कधी एकदा तो दिवस उजाडतो असे झाले होते.शेवटी तो दिवस आला आणि आम्ही सर्वजण ठरल्याप्रमाणे दादर ला एकत्र भेटलो.मग तिथूनच आमचा रायगड च्या दिशेने प्रवास सुरु झाला.माझी पहिलीच ट्रेकिंग होती पण सगळेच समान वयाचे होतो त्यामुळे कोणी अनोळखी आहे असे वाटलेच नाही.जसा प्रवास सुरु झाला तशी उत्सुकता वाढत होती की कधी एकदा रायगड ला पोहोचतोय.शेवटी मग पहाटे पाच च्या सुमारास तिथे पोहोचलो.मग तिथेच एका ठिकाणी सकाळची न्याहारी केली आणि मग सर्वानी एकमेकांची ओळख करून दिली. त्यानंतर मग गड चढण्याच्या दिशेने मार्गस्थ झालो.गड चढताना थोडे दमायला होत होते पण तरीसुद्धा त्याहून जास्त एक विलक्षण आनंद होता, कि इतक्या   सुंदर ठिकाणी यायला मिळाले. त्यानंतर जवळपास दोन तासात आम्ही गड चढलो.वेगळ्या ठिकाणांची माहिती घेत घेत आमचा प्रवास चालू होता.नंतर मग तिथेच एका ठिकाणी एका घरात दुपारी जेऊन तिथेच थोडावेळ विश्रांती घेऊन पुढच्या ठिकाणांचे दर्शन घेण्यास निघालो.तेथून दोन तासात परत येऊन एका ठिकाणी सगळ्यांनी मिळून तंबू ची सोय केली.आणि मग परत त्या घरी येऊन तिथेच थोडावेळ सगळे जण गप्पा मारत बसलो.मग थोड्यावेळाने रात्रीचे जेवण उरकून सगळे जण तंबू च्या इथे जायला निघालो. तिथे पोहोचल्यावर प्रथम सर्वानी आपापल्या तंबू मध्ये झोपण्याची तयारी केली आणि त्यानंतर सगळे जण त्या सुंदर अशा चंद्राच्या उजेडात,निसर्गाच्या सानिध्यात गप्पा मारत बसलो.छान गार वारा सुद्धा सुटला होता. गप्पा मारायला खूपच छान वाटत होते.कोणी भुतांच्या गोष्टी, तर कोणी आपल्या आधीच्या ट्रेकिंग चे अनुभव सांगत होते.गप्पा छान रंगल्या होत्या.कधी गप्पांमध्ये दोन तास निघून गेले कळलेच नाही.त्यानंतर मग सकाळी लवकर उठायचे होते म्हणून सगळे जण आपापल्या तंबूत झोपायला गेले.तंबू मध्ये गेल्यावर सुद्धा कोणाला झोप येत नसल्यामुळे मजा-मस्ती चालू होती आणि मग नंतर सगळे झोपी गेलो.मग दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता उठलो.बाहेर एकदम मनाला प्रसन्न करणारे वातावरण होते.छान गार वारा,सर्वत्र दाट धुके पसरले होते.सगळ्यांनी मग तंबू एकत्र केले आणि त्या घराच्या दिशेने गेलो.तिथे जाऊन मग सगळे ताजे-तवाने होऊन सकाळची न्याहारी करून टकमक टोक आणि जगदीश्वर मंदिराच्या दिशेने निघालो.तिथे पोहोचल्यावर मग दर्शन घेऊन झाल्यावर थोडावेळ तिथे बसलो आणि मग तिथून बाहेर पडल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.त्यानंतर मग थोडावेळ तिथेच विश्रांती घेतली आणि आणि मग तिथून परत त्या घराच्या दिशेने निघालो.तिथे पोहोचल्यावर सगळ्यांनी आपले सामान एकदा नीट बघितले आणि मग आम्ही सर्वजण गड उतरण्याच्या दिशेने रवाना झालो.गड स्वच्छ ठेवण्याच्या हेतूने एक मोहीम सुद्धा आम्ही राबवली होती.जवळपास एक-दीड तासात गप्पा मारत मारत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.गड उतरून झाल्यावर मग दुपारी जेऊन तिथेच थोडावेळ विश्रांती घेऊन मग आम्ही जिजाऊ मातांच्या समाधीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.निघताना सुद्धा गाडीत मजा-मस्ती चालू होती.मग जवळपास साडे दहा च्या सुमारास दादर ला पोहोचलो.मग सगळ्यांनी आपापले सामान घेऊन आम्ही सर्वजण आपल्या दिशेने एक आठवणींचा खजिना घेऊन निघालो.तर अशी ही रायगड किल्ल्या ची अतिशय ऐतिहासिक,अविस्मरणीय ट्रेकिंग सगळ्यांना मनाला आनंद देणारी होती.